मुंबई (वृत्तसंस्था) – देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. मार्चअखेर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्राचा मृत्यूदर हा चिंतेचा विषय बनला होता. परंतू आता कोरोनाचा मुकाबला करताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मृत्यूदर घटला असून गेल्या 15 दिवसांत जागतिक सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर 4. 40 टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. तर जागतिक मृत्यूदर 6. 90 टक्के इतका आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरुन 5 वर आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे,चाचण्या केल्या जात आहेत,सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असा दिलासा आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे.
अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने 50 हजार बळी घेतले आहेत. तर गेल्या 24 तासांत तिथे 3 हजार मृत्यू झाले आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीत देखी अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत.







