न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – युरोप आणि अमेरिकेतील त्वचा विशेषज्ञ सध्या करोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासंबंधी दिसत असलेल्या एका नव्या लक्षणाबद्दल चर्चा करत आहेत. खासकरुन हे लक्षण लहान मुलं आणि तरुणांमध्ये दिसत आहे. मार्च महिन्यात इटलीमधील काही त्वचा विशेषज्ञांना करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज येत असून जळजळ होत असल्याचे लक्षात आले होते.
त्वचा विशेषज्ञांनी या लक्षणाला (कोविड टोज) असे नाव दिले आहे. इटलीमध्ये करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या ठिकाणी ही समस्या सर्वात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आता मात्र ही समस्या फक्त इटलीपुरती मर्यादित राहिलेली नसून अमिरेकेतही अशी लक्षणे दिसत असल्याचे समोर आले आहे. खासकरुन सर्वात जास्त बाधित झालेल्य बोस्टनमध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मटोलॉजीशी संबंधित डॉक्टर ‘कोविड टोज’ची समस्या घेऊन य़ेणाऱ्या लहान मुलांची करोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. इटलीमध्ये या मुलांमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. यामुळे त्वचा विशेषज्ञ आणि मेडिकल प्रोफेशनल यांच्यात यावरुन अनेक वाद-विवादही रंगले होते.
करोना महामारी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. जागतिक आरोग्य संघटना करोनाशी लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचा शोध घेणे हे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे करोनाग्रस्त देशांना पुन्हा एकदा मृत्यू झालेल्यांची माहिती मिळवण्यास भाग पाडले आहे.