मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे एस.टी. सेवा पुर्णपणे बंद आहे त्याचा परिणाम एस.टी. महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थेवर झाला असून आधीच गोत्यात असणाऱ्या महामंडळाला आता बुडण्यापासून वाचवायचे असेल तर राज्य शासनाने आधार देण्याची गरज आहे. अन्यथा एस.टी. वाहतूक सेवा पुर्णपणे ठप्प होईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. करोनाच्या प्रसार रोखण्यासाठी राज्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर एस.टी.सेवा पुर्णपण बंद करण्यात आली आहे, ती आता दि. 3 मे पर्यंत बंद राहणार आहे. म्हणजे साधारणत: दिड महिना एस.टी. सेवा बंद आहे. या काळात एक रूपयाचे सुद्धा उत्पन्न झालेले नाही. त्यानंतर ही म्हणजे 3 मे नंतर जरी वाहतूक सुरू झाली तरी लगेच सगळे सुरळीत होईल, अशी शक्यता नाही. अशा परिस्थिती मध्ये आता कर्मचाऱ्याचे पगार देणे सुद्धा अवघड झाले आहे, अशा परिस्थितीत राज्य शासनाने आधार दिला तर नक्कीच आर्थिक स्थिती थोडी फार सुधारण्यास मदत होईल.
यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. या मध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ही वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक हजार कोटी रूपयांची मदत देण्यात यावी. त्याचबोबर महाराष्ट्रातील सर्व टोल टॅक्स माफ करण्यात यावेत. मोटार वाहन कर माफ करण्यात यावा. डिझेल वरील व्हॅट कर माफ करण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थाचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश देण्यात यावेत, अशा विविध मागण्या या निवेदनात केल्या आहेत.
आधीच एस.टी. महामंडळाला सहा हजार कोटी रूपयांचा तोटा आहे, त्यात गेले दीड महिना एस.टी. सेवा बंद असल्याने रोजचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे ते वेगळेच आहे. या आर्थिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी महामंडळाचा बराच कालावधी जाणार आहे.मार्च महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य शासनाने 150 कोटी रूपयांची मदत केली होती. त्याप्रमाणे आता एप्रिलचा पगार देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती एस.टी. महामंडळाकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.