मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सैफ अली खानने एका मासिकेच्या कार्यक्रमात आयुष्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने शूटिंग बंद आहे. त्यामुळे नायक-नायिकांना जुन्या आठवणी शेअर करणे, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणे आणि फोटो शेअर करणे यास भरपूर वेळ मिळत आहे. यास सैफ देखील अपवाद नाही. त्याने एका कार्यक्रमात आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. आपण सध्या काय काय करत आहोत, हे देखील सांगितले. मुलगा तैमूर अली खानपासून पत्नी करिना कपूर खानपर्यंतच्या सर्व गोष्टी शेअर केल्या. तसेच सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले.
कोरोना व्हायरसमुळे वातावरण बिघडले असून सर्वांनी एकत्र येऊन त्याचा सामना करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण युद्ध करत आहोत. आरोग्य कर्मचारी चांगल्या रितीने काम करत असल्याने आपण घरात सेफ आहोत, असे तो म्हणतो. सध्याच्या काळात वातावरण वेगाने बिघडत चालल्याचेही तो म्हणतो. राष्ट्रभक्तीच्या प्रश्नावरून तो म्हणतो, या मुद्द्यावर आपण यापूर्वीही बोललो आहे. मी एक कलाकार आहे आणि लोकांना एकत्र ठेवण्यावर विश्वास ठेवतो. ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिले ते आता नाहीत. नवीन जे लोक आहेत, ते नवीन विचार घेऊन समोर येत आहेत.
देशभक्त सिद्ध करून दाखवण्याची स्पर्धा लागली असून अशा प्रकारची मानसिकता देशात विकसित होत आहे. याचा अर्थ काय? ही बाब चांगली असली तरी भारतीय म्हणजे काय? केवळ हिंदू असणे की केवळ भारतात जन्म घेणे, एवढ्यापुरतची त्याचा अर्थ मर्यादित आहे काय?, असा प्रश्न सैफ करतो. माझ्या मते, देशावर किती प्रेम करता, यावर सर्वकाही अवलंबून आहे. हे असे प्रश्न आहेत की, त्याचा शेवट कोठे होईल, हे आताच सांगणे कठिण आहे.
सैफला जेव्हा करिनाच्या अभिनयाबाबत विचारले असता, तो म्हणतो की, मी तिच्या अभिनयाविषयी काही सांगितले तर लोकांना ते मान्य होणार नाही. माझ्या मते ती खूपच कूल आहे. ज्यारितीने ती आतापर्यंत आयुष्य व्यतित करत आहे, आणि करियरला बॅलेन्स करत आहे, ते कौतुकास्पद आहे. वेळेचे नियोजन कसे करावे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. ती मला नेहमी म्हणते, शनिवारी तू काही तयार करत का नाही. मी घरीच असेन. ती सेटवर काम करताना खूपच रिलॅक्स असते, असेही सैफ म्हणतो.