न्यूयॉर्क : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर औषध शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने करोनावर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला केला आहे. या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, या व्हॅक्सिनची आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या या दाव्यामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.
कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. हे व्हॅक्सिन करोनावर 100 टक्के उपायकारक ठरेल असा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. पण, त्याआधीच अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सनसोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जुलै महिन्यामध्ये या व्हॅक्सिनच्या माणसावरील चाचणीला सुरूवात करेल. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेची मॉडर्ना (Moderna Inc) ही बायोटेक कंपनीही व्हॅक्सिन बनवण्यामध्ये पुढे आहे. करोनाच्या 600 रुग्णांवर कंपनीने आपल्या व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. रुग्णांवर याचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. करोना व्हॅक्सिन बनवण्यामध्ये एस्ट्राजेनेका, सनोफी, फाइजर आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांसारख्या कंपन्याही आहेत. या कंपन्यांच्या व्हॅक्सिनची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. जगभरात सध्या जवळपास 10 व्हॅक्सिनची मानवावर चाचणी सुरू आहे. सुरक्षित आणि परिणामकारक व्हॅक्सिन येण्यास ट्रायल सुरू झाल्यानंतर साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो असे तज्ञ लोकांकडून सांगण्यात येत आहे.







