मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर आपापल्या गावी परतले. पण वसईहून उत्तर प्रदेशला निघालेली ओदिशाला पोहोचली. कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रेनचा मार्ग बदलल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.
21 मे रोजी वसई ते गोरखपूर या श्रमिक स्पेशल ट्रेनमधले प्रवासी काल (22 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकावर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही ट्रेन ओदिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
जवळपास 36 तास प्रवास केल्यानंतर आपण उत्तर प्रदेशमध्ये नसून ओदिशामध्ये पोहोचल्याचं कळताच प्रवासी गोंधळले असून संबंधितांना विचारपूस करत आहेत. मात्र त्यांना कोणीही समाधानकारक उत्तर देत नसल्याची तक्रार ते करत आहेत. मात्र पुढील प्रवास कसा करायचा आणि गोरखपूरला कधी पोहोचणार याबाबत कोणतीही माहिती किंवा घोषणा रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याचा दावा प्रवासी करत आहेत. या प्रकाराचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल करुन तक्रार करत आहेत. रेल्वे चालक रस्ता चुकल्याचा दावा प्रवाशांकडून केला जात आहे.