नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेऊन आता जवळपास एक आठवडा उलटला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नैराश्य आल्यामुळे त्याने जीवन संपविल्याची चर्चा आहे. अशातच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने सोशल मीडियामधून काढता पाय घेतला आहे. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेक वेळा ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहाने तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. ब्रेकअप झाल्यावर नेहाने सोशल मीडियावर व्यक्त होउन भावनांना वाट मोकळी केली होती. मात्र आता तिने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली. मी इथून बाहेर पडते, पण मरणार नाही असे तिने म्हटले आहे.
मी पुन्हा शांत झोपण्यासाठी जात आहे. ज्यावेळी जगात सगळे चांगले घडू लागेल तेव्हा मला झोपेतून उठवा. या नव्या जगात जिथे प्रेम, आदर, स्वातंत्र्य, काळजी, मज्जा-मस्ती, स्वीकृती आणि चांगली माणसे असतील. या जगात द्वेष, घराणेशाही, मत्सर, जजमेंट्, हिटलर्स, खून, आत्महत्या आणि वाईट माणसे सार्यांना थारा नसेल. काळजी करु नका, मी मरणार नाहीये, फक्त काही काळासाठी या सगळ्यांपासून लांब जात आहे, असे नेहाने पोस्टमध्ये म्हटले आहे.