आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय पथकातील अप्पर वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. अरविंद अलोने, डॉ.सुनील खापर्डे यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अमळनेरमधील कोरोनाने घातलेल्या थैमानाबाबत
जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन देताना राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवती जिल्हा अध्यक्षा कु. ज्योती भोई .
अमळनेर- (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, न.प. मुख्याधिकारी , ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी ज्योती भोई यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे.
ज्योती भोई यांनी केंद्रीय पथकाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव जिल्हयामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. जिल्हयामध्ये असलेल्या एकूण रूग्णसंख्येपैकी सर्वात जास्त रूग्णांची संख्या अमळनेरमध्ये आहे. ही बाब अमळनेरमधील महसूल, पोलीस व वैद्यकीय सेवा प्रशासनाला माहिती होती, तरी देखील त्यांचेकडून दक्षता घेण्यात आलेली नाही. अमळनेरमध्ये लॉकडाऊन असताना देखील बाहेरचे लोक शहरात प्रवेश करतच होते. शहरातील लोक बाहेर जाऊन येत होते.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सदगुरू सखाराम महाराज, श्री विठ्ठल रूख्मिणी संस्थानच्या सखाराम महाराज पुण्यतिथी वपालखी उत्सवाला तहसीलदारांनी परवानगी नाकारली असताना पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी जनतेच्या आरोग्याचा खेळ करून स्वत: त्या कार्यक्रमास हजेरी लावून हा उत्सव लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये कोणत्याही भक्ताने मास्क न लावता काळजी घेतलेली नव्हती. व्हिडीओही काढण्यात आलेले होते. कार्यक्रम घेण्यास त्यांची मूकसंमती होती हे स्पष्ट दिसून येते.
अमळनेर येथील प्रतिबंधित क्षेत्र घोषित परिसरातून दोन युवक चोपडा येथील पोलीस विभागामध्ये हवालदारपदी कार्यरत नातेवाईकाच्या घरी गेले व त्यांच्या संक्रमणातून हवालदार कर्मचार्याचे संपूर्ण कुटुंब ( प्रारंभी पाच लोक) कोरोनामुळे बाधित झाले. दोन युवक या झोनमधून व अमळनेर सीमेच्या बाहेरच कसे पडले, त्यांनी पोलीस अधिकाकार्याला चिरीमिरी देऊन अमळनेर मधून पलायन केले. हे दोन्ही तरूण कोरोना पॉझिटिव्ह होते. विशेष म्हणजे चोपडा शहरामध्ये त्याकाळात एकही कोरोनाचा रूग्ण बाधित नव्हता. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. याला पूर्णत: जबाबदार अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हेच आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोन घोषित अहमदनगर जिल्हयातून श्रीमती शबनम उर्फ समिना मोमीन ही महिला चार जिल्हे
ओलांडून अमळनेरला आली. नंतर तिने दिवसभर धिंगाणा केला, दिवसभर ही महिला अमळनेर शहरातून कोणतीही काळजी न घेता मास्कशिवाय फिरली. त्या दिवशी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर तहसीलदार मिलींद वाघ यांना सांगितले त्यांनी, हे काम माझे नाही पोलीस विभागाचे आहे असे सांगून जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती देऊनसुध्दा तिची तपासणी करून तिला विलगीकरणात ठेवलेे नाही, तिला पुन्हा अहमदनगर जिल्हयामध्ये पलायन करण्यास मदत केली गेली.
महसूल, पोलीस प्रशासनातील कोणत्याही अधिकार्याचा वचक अमळनेरमधील कोरोनाच्या प्रादुर्भावावर दिसून येत नाही आहे. कोणत्याच परिस्थितीमध्ये त्यांनी कोव्हीड-19 सेंटरला भेटी न देता घरात बसून कामकाज केल्याचे दिसून येते. या ज्वलंत प्रश्नाबाबत माजी आमदार स्मिता वाघ यांनी आवाज उठविलेला आहे, परंतू जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही . दोषींना वरिष्ठांकडून पाठीशी घातले जात आहे. याचे आश्चर्य वाटते.
पथकाने ज्योती भोई यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत त्यांचे कौतुक केले. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी ज्योती भोई या जनतेच्या समस्यांबद्दल वेळोवेळी प्रशासनाला माहिती देतात, अशी प्रशंसा केली. अमळनेरमधील वाढलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येस जबाबदार असलेल्या अधिकार्यांची चौकशी होऊन बडतर्फ करण्यात यावे, कारवाई झाली नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी प्रांताधिकारी सिमा अहीरे , तहसिलदार मिलिंद वाघ , गटविकास अधिकारी संदीप वायाळ , मुख्याधिकारी विद्या गायकवाड , प्रकाश ताळे , पोलिस निरीक्षक अंबादास मोरे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी , डॉ. संदीप जोशी , नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन , डॉ. राजेंद्र शेलकर आदी उपस्थित होते .