जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील हद्दपार आरोपी किरण खर्चे हा त्याच्या हद्दपारीचे उल्लंघन करून त्या भागात येऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणयाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती . त्याच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीनाथ फड यांनी त्याला 6 महिने तुरूंगवास व 2 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी किरण खर्चेला 10 ऑगस्ट , 2017 रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर तो 15 ऑगस्ट , 2018 रोजी शहरात बेकायदा प्रवेश करून सुप्रीम कॉलनीतील मच्छी बाजार भागात हातात तलवार घेऊन लोकांना धमकावताना आढळल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीनाथ फड यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. सरकारी अभियोक्ता निखिल कुलकर्णी यांनी पोलिसांची बाजू मांडली. पैरवी अधिकारी पो. हे. कॉ. शंकर सपकाळे होते. सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व पो. कॉ. सतीश गर्जे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.








