नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनय क्षेत्राात अमिताभ बच्चन या नावाचा दबदबा असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केले होते. मात्र त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर चालली नाही. त्यामुळे कलाविश्वात जवळपास 20 वर्षांचा प्रवास करुनही त्याचं बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम झालेले नाही. अलिकडेच अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मला कोणीही लाँच करण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले आहे.
अभिषेकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्याच्या करिअरच्या सुरुवातीचा संघर्ष सांगितला आहे. 2000 मध्ये जे.पी.दत्ता यांच्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून मी कलाविश्वात पदार्पण केले होते. मात्र यापूर्वी 1998 साली राकेश ओमप्रकाश मेहरा ‘समझौता एक्स्प्रेस’ हा चित्रपट तयार करणार होता. या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र अथक प्रयत्न केल्यानंतरही मला कोणीच लाँच करायला तयार नव्हते. मला आठवतंय मला काम मिळावे म्हणून मी कित्येक दिग्दर्शक, निर्माते यांच्या भेटी घेतल्या.
मला काम करण्याची संधी द्या यासाठी विनंतीही केली. मात्र त्यावेळी कोणीच तयार नव्हते. त्यामुळे मी आणि राकेशने स्वत: काही तरी करायचा निर्णय घेतला. यात राकेश ‘समझौता एक्स्प्रेस’चे दिग्दर्शन करेल आणि मी अभिनेता म्हणून काम करेन असे ठरले होते. मात्र तो चित्रपट अर्ध्यावरच रखडला. समझौता एक्स्प्रेस’साठी मी जो लूक केला होता तो, जे. पी.दत्ता यांनी पाहिला आणि त्यांच्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटात मला मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरासोबत काम करण्याचं स्वप्न मी 1998 मध्ये पाहिलं होतं. ते 2009 मध्ये पूर्ण झालं. त्याच्या ‘दिल्ली 6’ मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे