नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि कलाकारांनी या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. अशातच आता लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. चिराग यांनी पत्रामध्ये उद्धव यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला आहे. बिहारमधून आलेला एक तरुण त्याच्या अभिनयामुळे केवळ बिहार नाही तर पूर्ण देशात लोकप्रिय होता त्याने आत्महत्या केल्याचे दु:ख आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
मी त्यांच्या कुटुंबाच्या काही व्यक्तींसोबत सतत संपर्कात आहे. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या जवळच्या लोकांनी या मागे काहीतरी कटकारस्थान असल्याचे संकेत दिले आहेत. सर्वांचे हेच म्हणणे आहे की सुशांतचा जीव जाण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीमधील गटबाजी कारणीभूत आहे. चित्रपट क्षेत्रातील गटबाजीमुळेच अनेक बड्या निर्मात्यांनी सुशांतवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे, असेही चिराग यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर छोट्या शहरांमधून आलेल्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणार्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्रामधून चिराग यांनी केली आहे. यापूर्वी चिराग यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. भाजपाचे खासदार आणि भोजपुरी चित्रपटांमधील अभिनेते मनोज तिवारी यांनाही सुशांतच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचीही तिवारी यांनी मागणी केली आहे. पाटण्यामध्ये राहणार्या सुशांतच्या नातेवाईकांची मागील काही दिवसांमध्ये अनेक राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी भेट घेतली आहे.