अमळनेर (प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यात अचानक आलेल्या वारा-वादळासह पावसामुळे रब्बी-उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणच्या भागात पाऊस गारपिटीसह वारा -वादळ झाल्याने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
याबाबत अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याशी संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले की, तालुक्यात एकूण ५० मि मी पाऊस झाला असून ३५६२.९२ हेक्टर शेतीला अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तर यापावसामुळे एकूण ४३ गावं आणि ४५०० शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तालुक्यातील वावडे, मंगरूळ व शिरूड या महसूल मंडळात अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले, त्यात पिपंळी बु ।। व खु।।, चिमनपुरी, वाघदे, आटाळे, अनोरे, आर्डी, लोढवें, निसर्डी, खडके, आंचलवाडी, शिरसाळे, जवखेडे, गलवाडे व ढेकू चारम या भागात गहू, मका, बाजरी व हरबरा पिकांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे व सदर नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान पाहण्यासाठी आमदार अनिल पाटील, विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ, तहसीलदार मिलिंद वाघ,तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ अधिकारी कचरे यांच्या सह प्रवीण पाटील, अमोल कोठावदे, धनराळे आप्पा, किरण पाटील, कुमुदिनी पाटील व सरपंच यांनी अनेक गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन देऊन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले.