जळगाव (प्रतिनिधी) –जिल्ह्यात आज मितीला कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यापूर्वीच केलेले
आहे.विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. मा.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त आपत्ती व्यवस्थापन समिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 30 (2) अन्वये काम करित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य ,गृह,जिल्हा परिषद,मनपा,अन्न औषध प्रशासन,महसूल इत्यादि विभागाला कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत वारंवार हात धुवावेत,खोकतांना अथवा शिंकतांना तोंडावर रुमाल धरावा तसेच सर्दी खोकल्याच्या रुग्णांपासून दुर रहावे,सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर थुकू नयेत.अन्न,फळभाज्या,पालेभाज्या तसेच मांस पूर्ण शिजवुनच खावेत,आजारी पाळीव प्राण्यांपासून दूर रहावे, सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नये,आणि अफवा पसरवू नये,आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन समितीकडून करण्यात आल्या आहेत. असे उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव दिपमाला चौरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.