नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पाकिस्तानमध्ये 1 लाख 81 हजारांपेक्षा जास्त करोना बाधितांची नोंद झाली आहे. सामान्य नागरिकच नव्हे तर राजकारणीही करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. अशातच पाकिस्तानमध्ये करोना व्हायरसाबद्दल किती जागरूकता आहे याचे उदाहरण इमरान खानच्या मंत्र्यानेच दिले आहे.
एका टीव्ही चॅनेलवर पाकिस्तानी राज्यमंत्री जरताज गुल यांची कोविड -19 बद्दल गंभीर चर्चा सुरू होती. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की कोरोना म्हणजे काय, तर त्यांनी एखाद्या तज्ञासारखे सांगितले की कोविड-19, या नावाप्रमाणेच अर्थ आहे की याचे 19 प्वाइंट्स आहेत, जे कोणत्याही देशात कोणत्याही प्रकारे लागू होऊ शकतात आणि आपली रोग प्रतिकारशक्ती विकसित करा, असे त्या म्हणाल्या.
कोविड-19चे आपल्या पद्धतीने केलेल्या वर्णनाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ख्वाजा असिफ नॅशनल हीरो नावाच्या एका ट्विटर हँडलने लिहिले आहे की, आज वैज्ञानिकांसाठी एक महान दिवस आहे, त्यांना आज जरताज गुल कडून कोविड -19 बद्दल काही नवीन शिकायला मिळाले.
दरम्यान, करोनाबाधितांच्या संख्येत पाकिस्तान जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी आहे. त्या देशात 1 लाख 81हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद झाली आहे. पाकिस्तानात करोनाने आतापर्यंत 3 हजार 530 बाधितांचा बळी घेतला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीपासूनच संकटात आहे. करोना संकटाने ती अर्थव्यवस्था आणखीच बेहाल झाली आहे. अशातच पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा सुमार दर्जाची असल्याचे करोना फैलावाने चव्हाट्यावर आणले आहे.







