नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजार 984 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 640 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाढणारी ही संख्या चिंताजनक असल्याचेही म्हटले जात आहे.
अशातच सर्व राज्यातील मुख्यमंत्री लोकांनी लॉकडाउनच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ घरी थांबण्याचे आवाहन करीत आहे. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मंगळवारी राज्यामध्ये एका हेल्पलाइन सेवेचे उद्घाटन केले. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांनी लॉकडाउनच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ घरी थांबावे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करु नये या उद्देशांतून ही हेल्पलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर किराणा मालाची यादी पाठवल्यास सामान घरपोच दिले जाईल. यासाठी कर्नाटक सरकारने 08061914960 हा क्रमांक जारी केला आहे. याबाबत येडियुरप्पा म्हणाले,’यामुळे कमीत कमी लोकं त्यांच्या घराबाहेर निघतील अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी घरीच थांबावे असे आम्ही त्यांना आवाहन करतो.’ येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. 08061914960 हा क्रमांक मोबाइलवर सेव्ह करा, त्यानंतर या क्रमांकावर हा असा मेसेज पाठवा तसेच तुमचे लोकेशन किंवा पत्ता शेअर करा. त्यानंतर किराणा माल आणि भाज्यांसाठी ए तर औषधांसाठी बी पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. तुम्हाला हव्या असणाऱ्या सामानाची यादी किंवा त्याचा फोटो पाठवा. ही यादी पाठवल्यानंतर तुमची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची ऑर्डर कन्फॉर्म करण्यासाठी तुम्हाला एका ट्रानझॅक्शन आयडीसहीत मेसेज येईल. ठरवून दिलेल्या वेळेत तुमच्या घरी सामान पाठवले जाईल. ऑर्डर आल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता. डिलेव्हरीसाठी १० रुपये अतिरिक्त शुक्ल आकारले जाईल.