पाचगणी (वृत्तसंस्था) – येथील जागतिक दर्जाच्या बिलीमोरिया हायस्कूलच्या 112 वर्षे जुन्या इमारतीला मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास अचानक आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी, पाचगणीत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा असून त्यात बिलीमोरिया हायस्कूलचा समावेश आहे. 1908 साली स्थापन झालेल्या या शाळेस तब्बल 112 वर्षे झाली असून शाळेची अतिशय देखणी जुनी इमारत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळेत असलेला जनरेटर सुरू करण्यात आला. मात्र, जनरेटरमधून निर्माण झालेल्या विजेचा दाब अचानक वाढल्याने संगणक कक्षाला आग लागली. ही आग शेजारच्या आर्ट गॅलरीत पसरली. शाळेत निवासी असलेल्या शिक्षकांनी याची माहिती व्यवस्थापनाला दिली. व्यवस्थापनाने पाचगणी पोलीस ठाणे व नगरपालिकेला माहिती कळविल्याने पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर, वाई पालिका आणि भुईंज येथील किसनवीर साखर कारखान्याचे अग्निशमन दलाचे बंबही काही वेळातच तेथे दाखल झाले. आठ बंबांच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शहरातील नगरसेवक व नागरिकांनी शाळेकडे धाव घेऊन मदतकार्य केले. सुदैवाने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शाळेच्या चेअरमन अदिती गोरडिया व अरुण गोरडिया यांना आश्रू अनावर झाले होते.







