पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना राज्य व केंद्र शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाने धान्य दिले असले तरी त्याचे वितरण योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातून काही भागात गोंधळाचे वातावरण सुद्धा निर्माण होत आहे. ही गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी याचे वाटप नियोजनपद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्यावतीने पिवळे व केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांना गहू आणि तांदूळ देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणी उपाशी राहू नये म्हणून सरकारने हे नियोजन केले आहे. या धान्याचे वितरण हे रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे. परंतु, या वितरणामध्ये विस्कळितपणा असल्यामुळे नागरिकांना पुरेसे धान्य मिळत नाही. काही ठिकाणी तर फक्त एकच वस्तू मिळते. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा दिसत आहे. या रांगेत काही वेळा सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा भान राहत नाही. त्यामुळे या धान्य वाटपात काही सुसत्रता येणे आवश्यक आहे. त्यासाठी टोकन पद्धत राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गर्दी सुद्धा होणार नाही.टोकन दिल्यावर ग्राहक दिलेल्या वेळेनुसार त्याठिकाणी हजर राहील म्हणजे त्याला फार काळ ताटकळत थांबवावे लागणार नाही. याशिवाय प्रत्येक दुकानदाराने बाहेर एक फलक लावणे आवश्यक आहे. त्या फलकावर आपल्याला किती धान्य शिल्लक आहे याचा सुद्धा तपशील त्यावर प्रसिद्ध करण्यात यावा. या संदर्भात स्वर्ण भारत पार्टीने एक निवेदन नागरिकांच्या सह्यांनी नुकतेच प्रशासनाला दिले आहे. त्यात रेशन वितरणातील गोंधळ तातडीने दुरू करावा अशी मागणी करण्यात आली असल्याचे ऍड. महेश गजेंद्र गडकर यांनी सांगितले.