मुंबई (वृत्तसंस्था) – कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दि. २० एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या ३२ वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील १६ कृष्णा मेडिकल काँलेजमधील ५ व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील १ अशा एकूण २२ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दि. २१ एप्रिल रोजी रात्री उशिरा ६ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे १, आरोग्य कर्मचारी १, प्रवास करुन आलेला १ आणि निकट सहवासातील ३ जणांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.