चाळीसगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला. यावेळी चाळीसगावचे तहसिलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.पी.बाविस्कर, शहर पोलीस निरीक्षक व्ही.एन.ठाकूरवाड, श.वाहतुक निरीक्षक आर.बी.किर्तीकर, मेहुणबारे पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जे.एस.महाजन, बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका सुनिता चव्हाण व सुनंदा पाटील, विस्तार अधिकारी के.एन.माळी, आर.टी.सैंदाणे, आर.आय.पाटील, आरोग्य पर्यवेक्षक बी.ई.देवरे यांच्याशी त्यांनी संवाद साधत कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी तालुका सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेत आपली जबाबदारी पार पाडल्यास निश्चितच आपण कोरोना पासून दूर राहू शकतो असा विश्वासही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्य, पाटणादेवी मंदिर, वालझिरी येथील दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले असून बामोशी बाबा दर्गा उरूस देखील थांबविण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील समर्थ बैठका ३१ मार्च पर्यंत बंद करण्याच्या निर्णय साधकांनी घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे स्वागत सर्वांनी केले. या आणीबाणीच्या परिस्थितीत डॉक्टर असोशिएशन व मेडिकल असोशिएशन, शहरासह तालुक्यातील सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेवून जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी १० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली असता आमदार मंगेश चव्हाण यांनी आपत्कालीन परिस्थितीत खाजगी रुग्णालयांची देखील मदत मिळवून देईन असे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले की ग्रामीण भागात दिवसाआड लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी दवंडी देण्यात येत असून कोरोना पासून खबरदारी घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचे बॅनर्स लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसिलदार यांनी शासकीय कार्यालये विशेषतः गर्दी होणाऱ्या कार्यालयात केवळ अति तातडीची कामे करावीत तसेच जी शासकीय कामे नंतर करता येतील त्यासाठी निश्चित असे निर्देश तलाठी व अधिकारी मार्फत लोकांपर्यंत पोहोचवावेत अशी सूचना आमदार चव्हाण यांनी केली. शहरातील गर्दी होणाऱ्या सर्व बँक, खाजगी कंपन्यांची कार्यालय यांची बैठक घेऊन कोरोना बाबत ते काय उपाययोजना व मदत करू शकतात याचा आढावा घेणेबाबत त्यांनी तहसिलदार व वैद्यकीय अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा तसेच शहरात चढ्या दराने सॅनीटायझर व मास्क विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी दिली. खबरदारी म्हणून गावातील यात्रा, सप्ताह आयोजित करू नये, तसेच लग्न व इतर समारंभ हे अश्या परिस्थितीत न घेता पुढे ढकलण्यात यावेत तसेच जे टाळता येणार नाही असे समारंभ मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गर्दी न करता पार पाडावेत यासाठी स्पष्ट सूचना पोलीस व महसूल प्रशासनाला द्याव्यात यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना फोनवरून विनंती केली असता ती त्यांनी मान्य केली.
चाळीसगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,आपले नातेवाईक, मित्र मंडळी हे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कामानिमित्त गेले असतील व ते आता आपल्या गावी परत आले असतील तर त्यांना कळजी म्हणुन मास्क,व कोरोना विषाणू संदर्भात आवश्यक ते प्रतिबंधक उपाय योजना करणे बाबत सुचीत करावे कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात काही संशय आल्यास किंवा लक्षणे आढळल्यास प्रशासकीय यंत्रणे शी संपर्क साधावा तसेच नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे आहे काही महत्त्वाचे काम असेल तरच घराचे बाहेर पडावे,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन व चाळीसगाव तालुका प्रशासन यांच्या कडून यावेळी करण्यात आले.