मुंबई (वृत्त संस्था) – गर्भवती महिलेला खांद्यावरून डोलीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना घनदाट जंगलात वाटेतच त्या महिलेची प्रसूती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मौजे पेढांबे वाडी याठिकाणी ही घटना घडली आहे.

चिपळूण तालुक्यातील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगर कपारीत वसलेल्या या वाडीत 20 ते 25 घरे आहेत. मात्र अनेकवेळा मागणी करून देखील या वाडीत रस्ता गेला नाही. कोणी आजारी पडले तर त्यांना डोली करावी लागते. त्यानंतर जवळपास 5 ते 6 किलोमीटर खांद्यावरून न्यावे लागते.
अशा प्रकारे शनिवारी सकाळी या वाडीतील एक गर्भवती महिलेला वेदना जाणवू लागल्या आणि त्या महिलेला नेहमीप्रमाणे डोलीतून दवाखान्यात घेऊन जात असताना अर्ध्या वाटेतच घनदाट जंगलात त्या महिलेची प्रसूती झाली. महिलेला जंगलातच ठेऊन गावातून आशा सेविकांना बोलावण्यात आले होते.







