नवी दिल्ली (वृत्त संस्था) – सीमावादावरून भारत चीन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारताला झटका देण्याच्या तयारीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प एच- 1 बी व्हीसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित करू शकतात, असे वृत्त वॉशिंग्टन येथील एका वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे एच-1 बी व्हिजा निलंबित केल्याने लाखो भारतीय नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारधीन असलेल्या प्रस्तावानुसार, जोपर्यंत निलंबन हटविले जाणार नाही, तोपर्यंत नव्याने एच-1 बी व्हिसा मिळालेल्या कोणालाही अमेरिकेबाहेरील व्यक्तीला अमेरिकेत येता येणार नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या व्हिसाधारकांवर मात्र या नियमाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. कोरोना संकटाच्या काळात कोणताही आजारी विदेशी नागरिक अमेरिकेत येता कामा नये, यासाठी ट्रम्प प्रशासन सर्व प्रकारचे रोजगार व्हिसा निलंबित करू इच्छित आहे.
महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या काळात विदेशी नागरिकांनी अमेरिकेत येऊन नोकऱ्या मिळवल्यास अमेरिकेतील स्थानिक बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची भीती ट्रम्प प्रशासनाला वाटत आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते होगन गिडले यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकी श्रमिक आणि रोजगार इच्छुकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासन अनेक पर्यायांचा विचार करत आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु, लवकरच निर्णय घेतला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला व्हीसा म्हणजे एच-1बी अमेरिकी व्हिसा आहे. या व्हिसावर हजारो भारतीय आयटी व्यावसायिक दरवर्षी अमेरिकेत जात असतात. मात्र, अमेरिकी नागरिकांनाच प्रथम रोजगार मिळायला हवा, अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. त्याअनुषंगाने व्हिसा निलंबनाच्या निर्णयावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारत चिन मधील सीमावादावरून आधीच संघर्ष सुरु आहे. त्यातच नेपाळने भारताचे तीन प्रदेश देशाच्या नकाशात दाखवून भारताकडे डोळे वटारले आहेत. तसेच नेपाळसोबत चीनने बांगलादेशाला देखील जवळ करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भारताच्या शेजारील राष्ट्राच्या आर्थिक कुटनीतीच्या डावात चीनने बांगलादेशच्या 97 टक्के उत्पानदनावरील टॅक्स हटवण्याची घोषणा केली. त्यातच आता अमेरिकेने देखील एच-1 बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित केल्यास भारताला मोठा झटका बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.







