जळगाव – शहरातील सुप्रिम कॉलनीत कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुराला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून 2 हजार रुपये हिसकावून दोघा संशयितांनी पळ काढला. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुप्रिम कॉलनीतील रहिवासी महेंद्र अमृत मंडल (वय-38) हे न्यू नॅशनल चटई प्लांट मध्ये मजुरीवर काम करतात. रविवारी घराचा पंखा खराब झाल्याने सुप्रिम कॉलनीतील इलेक्ट्रीक दुकानावर जात असताना दोन अनोळखी तरुणांनी रस्ता अडवून विनाकारण मारहाण करत खिशातून दोन हजार रुपये काढून घेत पिटाळून लावले. महेंद्र मंडल याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे