पुणे (वृत्तसंस्था) – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात येऊ लागला आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया होणार की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून पालकांना मुलांच्या ‘आरटीई’ प्रवेशाची चिंता लागली आहे.
दरम्यान राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ‘आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. या प्रवेशासाठी पालकांना दरवर्षी उत्सुकता लागलेली असते. यंदा राज्यातील ९ हजार ३३१ शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. या शाळांमध्ये १ लाख १५ हजार ४४६ प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत.
या प्रवेशासाठी २ लाख ९१ हजार ३७० पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. या प्रवेशासाठी १७ मार्च रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. यात १ लाख ९२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली. ही मूळ निवड यादी म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आला आहे. लॉटरी लागलेल्या पालकांनी वेळापत्रकानुसार पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची तपासणी करुन शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३ एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
मार्च महिन्यापासून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यात करोनाचा प्रभाव आढळल्याने प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आधी राज्यात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन होता. त्यानंतर हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर १७ मे, ३१ मे असा लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. वाढत्या लॉकडाऊन बरोबरच प्रवेश प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात येऊ लागली आहे. यामुळे पालकांना मात्र मुलांच्या प्रवेशा बाबतचा प्रश्न पडला आहे.
प्रवेशाबाबत ‘आरटीई’ पोर्टलवरही काही नवीन सूचना प्रसिध्द करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे पालकांकडून प्रवेशाबाबत सतत विचारणा करण्यात येऊ लागली आहे. ‘आरटीई’अंतर्गत सोयी ची शाळा न मिळाल्यास पालकांना प्रवेशा साठी पर्यायी शाळांचा शोधही घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने पालकांकडून हालचालीही सुरु झालेल्या आहेत. (((( चौकट – लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सन २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर सर्व शाळा सुरु होतील.
मात्र याची तारीख अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर तात्काळ ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविताना पडताळणी समितीकडे व शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी पालक, विद्यार्थी यांची गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी बाळगावी लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.