नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – भारत आणि चीन यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. दरम्यान, चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी आज सकाळी एकापाठोपाठ एक आठ टि्वट केले. या टि्वटमध्ये त्यांनी गलवान खोऱ्याचा भाग चीनचा कसा आहे? हे सांगताना सोमवारी तिथे घडलेल्या रक्तरंजित संघर्षासाठी भारताला जबाबदार धरले आहे.

उलट भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केली असा त्यांचा आरोप आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारताकडून सुरु असलेली इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी हे चीनचे मूळ दुखणे असल्याचेही त्यांच्या सर्व टि्वटमधून स्पष्ट झाले आहे.
पश्चिम क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीमध्ये गलवान खोरे आहे, असा झाओ लिजियन यांनी दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिनी सैनिकांच्या तुकड्या इथे तैनात असून ते या भागामध्ये पेट्रोलिंग करतात. एप्रिल महिन्यापासून गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्य तुकडया रस्ते, पूल आणि अन्य सुविधांची उभारणी करत आहेत. आम्ही याचा निषेध नोंदवला. पण भारताने त्यापुढे जात नियंत्रण रेषा ओलांडली व चिथावणी दिली असा आरोप झाओ लिजियन यांनी त्यांच्या टि्वटमधून केला आहे.
सहा मे रोजी भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडून तटबंदी तसेच बॅरिकेडसची उभारणी केली. त्यामुळे चीनच्या सैनिकांना पेट्रोलिंगमध्ये अडथळे आले. भारताने एकतर्फी जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करुन जाणीवपूर्वक चिथावणी दिली असा उलटा आरोप चीनने केला आहे.







