नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसल्याचंही बोलले जात होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत हे वृत्त फेटाळून लावला. त्याचबरोबर चीन सैन्य भारतीय भूभागावर आलं नव्हतं, असा दावाही केला होता. त्यावरूनही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. तो व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे.
एका शूर जवानांच्या पित्यानं स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं, असं ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.







