नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पालघर जिल्ह्याच्या गडचिंचले गावात झालेल्या हत्याकांड प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच गृह मंत्रालयाने या घटनेसंदभात राज्य सरकारकडे अहवाल मागविला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांनी देखील या घटनेचा रोष व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. १६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्याच्या गडचिंचले गावात चोर समजून तीन जणांना ठेचून मारल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी ११० जणांवर गुन्हा दाखल केला असून १०१ जणांना ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, ९ अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. गडचिंचले गावात झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणी कासा पोलिस स्टेशनच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तीन साधूंची हत्या केल्या प्रकरणी हनुमानगढीचे पुजारी राजू दास अयोध्येत धरणे आंदोलन करीत आहेत. आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र सरकारविरोधात आनॊदलं करणार असल्याचे अखिल भारतीय अखंड परिषदेचे अध्यक्ष्य महंत गिरी यांनी सांगितलं. त्यांनी घटनेबाबदल रोष व्यक्त केला असुन दोषींवर लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारने आरोपीविरुद्ध कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्र येऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान पालघर घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. ‘पालघरमधील घटना गैरसमजुतीतून झाली. या घटनेचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही. कोणीही या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये,असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.