वाशिंग्टन (वृत्तसंस्था) – चीनमधील वूहान शहरांमधून करोना व्हायरस जगभर पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. जर चीनने सर्व माहिती असताना हा व्हायरस पसरू दिला असेल तर चीनने गंभीर परिणामांना तयार राहावे असा इशारा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेतील बऱ्याच वृत्त माध्यमातून हा व्हायरस वूहान येथील चीनच्या प्रयोगशाळेतून बाहेर आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर चीनने वेळीच याबाबतची सूचना जगाला दिली नाही असाही आरोप केला जात आहे. या बाबी दडपण्यासाठी स्वत:च्या देशात मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडाही दडपला आहे असा आरोप करण्यात येत आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर चीनने माहीत असूनही असा प्रकार घडू दिला असेल तर चीनवर परिणाम होतील. एवढा भयानक प्रकार घडत असताना चीनने याची गंभीर दखल घेतली नाही किंवा जगाला याबाबत माहिती दिली नाही. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याकडे दुर्लक्ष केले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याच कारणावरून अमेरिकेचा जागतिक आरोग्य संघटनेला दिला जात असलेला निधी रोखला आहे. करोना व्हायरस उद्भवण्यापर्यंत आपले चीनची अतिशय सलोख्याचे संबंध होते. मात्र करोनाव्हायरसबाबत जो प्रकार घडला आहे त्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. चीनला याबाबत खरोखरच काही लपवाछपवी करायची नसती तर चीनने इतर देशातील शास्त्रज्ञांना आपल्या प्रयोगशाळेची तपासणी करू दिली असती. मात्र याबाबत चीन का नकार देत आहे हे अनाकलनीय आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. चीन मधील मृत्यूच्या आकडेवारी बद्दलही ट्रम्प यांनी शंका व्यक्त केली. एवढा मोठा देश आणि इतकी मोठी लोकसंख्या असताना इतक्या कमी प्रमाणात लोक चीनमध्ये कसे मृत्यू पावले हे समजत नाही. याचा अर्थ चीन याबाबतची आकडेवारी दाबत आहेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या या भूमिकेला जर्मनी, ब्रिटन या देशांनी अगोदरच पाठिंबा दिला आहे. आज ऑस्ट्रेलियन सरकारने ही चीनच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली.