मुंबई (वृत्तसंस्था) – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने गेल्या आठवड्यात तीन प्रवाशांची चोर समजून दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, गडचिंचले येथे चोर आल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर ग्रामस्थांनी दाभाली-खानवेल मार्गावरुन जाणाऱ्या गाडीला अडवले. या कारमध्ये बसलेल्या तिघांची त्यांनी विचारपूस केली. त्यांनी काही सांगायच्या आत ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर इतर ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती कळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जमावाने पोलिसांनाही दाद दिली नाही. या तिघांची निघृण हत्या करण्यात आली, या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. त्यानंतर या तीन जणांवर आणि कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व १०१ जणांना आरोपींना अटक केली आहे.