नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरस देशभरात थैमान घालत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाच्या संशयितांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, संशयितांनी घेऊन जाण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तुफान राडा घातला. कर्नाटकातील पडरयानपुरा येथे रविवारी ही घटना घडली आहे. माहितीनुसार, करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात काही तरुण आले होते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी बंगळुरू महापालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. क्वारंटाइन होण्याऐवजी तरुणांनी दादागिरी सुरू केली. याचे रुपांतर पुढे तोडफोडीमध्ये झाले. त्यांनी आजूबाजूला असलेल्या गोष्टींची तोडफोडही केली आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी बळाचा वापर करून या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण मिळवले आहे.दरम्यान, कर्नाटकात करोनाग्रस्तांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण बंगळुरूमधील आहेत.