जळगाव (प्रतिनिधी) – घरघुती वादातून एकाने घरात कोणीही नसतांना मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शेख अझर शेख हसन (वय-२८) रा. अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉलनी हा पत्नी व मुलांसोबत आईवडीलांपासून वेगळा राहत होता. बांधकामाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही दिवसांपासून घरघुती वादातून पत्नी तीन दिवसांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे घरात एकटाच होता. मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आज सकाळी ठेकेदार शेख अझरला कामावर घेऊन जाण्यासाठी सकाळी ९ वाजता त्याच्या घरी आला. बराच वेळ दार ठोठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून बघितले असता शेख अझर गळफास घेतल्याचे लक्षात आले. एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर मृतदेह खाली उतरविण्यात आला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी सोनवणे करीत आहे.