जळगाव (प्रतिनिधी) – देशामध्ये जीवघेणा कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून त्यामुळे आरोग्य विषयक गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी उप प्रादेशिक कार्यालयामध्ये अनुज्ञप्तीसाठी असणारा दैनंदिन 200 चा कोटा कपात करण्यात येवून प्रतिदिन फक्त 40 वर करण्यात आला आहे. तसेच संगणकीय शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी रद्द करण्यात आलेली असून एकावेळेस फक्त एकच नागरीकाची शिकाऊ अनुज्ञप्तीची मौखिक परिक्षा घेण्यात येईल. पक्कया अनुज्ञप्तीकरीता ज्यांची शिकाऊ अनुज्ञप्ती 31 मार्च, 2020 पर्यंत संपणार आहे अशांचीच चाचणी घेण्यात येणार आहे. कार्यालयात योग्यता प्रमाणपत्राचा कोटा 90 वरून 30 वाहनांचा करण्यात आलेला आहे. कार्यालयात वाहन हस्तांतरण, वाहनाचा बोजा चढविणे, उतरविणे इत्यादी कामकाज दिनांक 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहे. कार्यालय मर्यादित क्षमतेत शिकाऊ अनुज्ञप्ती, परवाना बाबत कामकाज करण्यात येईल. मासिक दौऱ्यांमध्ये फक्त नवीन वाहन नोंदणीचे कामकाज सुरू राहील.तरी सर्व नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी कार्यालयात गर्दी करून नये व कार्यालयास सहकार्य करावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.