‘ज्याच्यासाठी घालतात कपडे तेच उघडे’ अशी गोष्ट ग्रामीण
भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात येणाऱ्या चेहऱ्यावरील मास्क संदर्भात झाली आहे. तोंड, नाक व हनुवटीचा संपूर्ण भाग झाकला गेला, तरच या मागचा उद्देश सार्थ होणार आहे. नाहीतर ज्या प्रमाणे गर्भनिरोधक साधनांचा वापर करूनही नको असलेल्या गर्भधारणांचे प्रमाणे जसे वाढत जाते (साधनांचा अयोग्य वापर केल्यामुळे) तसे मास्क वापरणाऱ्याच्या संख्येत वाढ होऊन (कोरोना छातीचा क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू अशा साथरोगांना आटोक्यात आणणे कठीण आहे.

म्हणूनच घराबाहेर पडल्यावर मास्क वापरणे बंधनकारक असले तरी मास्क कसे वापरावेत, कोणी वापरावेत, मास्क चे प्रकार व मास्क निकामी झाल्यावर त्याची विल्हेवाट कशी करावी याबाबत जनजागृती होणे लाभकारक आहे
मास्क कोरोनामुळे सामान्यांपर्यंत पोहोचला असला तरी यापूर्वी शस्त्रक्रियागृह कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित होता. त्या ठिकाणी १९६० सालापासून सर्जिकल मास्क वापरला जात होता.
शस्त्रक्रियागृहात कार्यरत आरोग्य व्यवसायीक व इतर निदान प्रक्रियेसाठी सर्जिकल मास्क वापरले जातात. सर्जिकल मास्क एक सैल फिटींग मास्क असून एकदाच वापरता येते (४ ते ६ तास), सर्जिकल मास्क हे घालणाऱ्याच्या तोंडासमोर व नाकासमोर शारिरीक अडथळा निर्माण करते.सर्जिकल मास्कच्या कडांची रचना नाक व तोंडाला संपूर्ण सील करण्यासाठी बनवलेली नसते.
ज्यांनी हा मास्क घातला आहे त्या आरोग्य व्यावसायिकांपासून रुग्णांना जिवाणूसंक्रमण होऊ नये हा हेतू असतो. ज्यांनी तो परिधान केला आहे त्या आरोग्य व्यावसायीकांना मात्र हवेतील जिवाणू व लहान आकाराच्या विषाणूपासून संरक्षण देण्यास हे सर्जिकल मास्क असमर्थ ठरतात. खोकला, शिंकणे, किंवा काही वैद्यकीय प्रक्रियांद्वारे प्रसारीत होणाऱ्या हवेतील फारच लहान कण हे सर्जिकल मास्क फिल्टर किंवा ब्लॉक करत नाही.
एन-९५ मास्क संरक्षणात्मक साधन आहे. एन-९५ मास्क चेहऱ्याशी सुसंगत असते आणि हवायुक्त कणांचे अत्यंत कार्यक्षम फिल्टरेशन करण्याचे काम ते करते. एन-९५ मास्क मुळे कोरोनासारख्या विषाणूपासून संरक्षण मिळते. एन-९५ चा अर्थ असा आहे की, जेव्हा काळजीपूर्वक चाचणी घेतली जाते तेव्हा हे यंत्र कमीतकमी (०.३ मायक्रॉन) चाचणी कणांना अवरोधीत करते.
एम-९५ रेस्पिरेटर मास्क अतिसुरक्षीत समजले जातात. सील प्रमाणीत रेस्पिरेटेड फायबर्स पासून हे बनवले जातात. त्यामुळे फिल्टरेशन चांगले होते.
एन-९५ मास्क सामान्य नागरीकांसाठी नसून आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या, अतीजोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी असतो. एन-९५ मास्क भारतासारख्या देशात एकदा वापरून फेकून देण्याच्या किमतीला मिळत नसल्यामुळे ते रोटेशनप्रमाणे मोकळ्या हवेत ठेवून ४ दिवसांनंतर पाच वेळा वापरण्याचे सुचविले आहे व नंतर मात्र बंद डस्टबिनमध्ये टाकून जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट अधिनियमानुसार ते नष्ट केले जातात.
ग्रामीण भागात हातरूमाल मास्क म्हणून सध्या काही नागरीक वापरत आहेत. चेहरा व हात पुसल्यानंतर हातरूमाल मास्क म्हणून वापरणे चुकीचे आहे. मास्क म्हणून वापरलेला हातरूमाल परत खिशात ठेवणे संसर्गास कारणीभूत होऊ शकते.
आजकाल मार्केटमध्ये फॅशनेबल डिझाईन व रंगीबेरंगी मास्क दुकानासमोर टांगलेले असतात. आवडीनुसार व पसंतीनुसार मास्क घेण्यासाठी बरेच लोक तो घालून परत ठेवतात. तोच मास्क नंतर दुसऱ्या व्यक्तीकडून परत चांगला दिसतो की नाही म्हणून घातला जातो. हे पूर्णपणे अयोग्य आहे संसर्ग पसरविण्याकामी पूरक आहे. मार्केटमधील मास्क घरी आणल्यानंतर साबणाने स्वच्छ धुवून वाळल्यानंतरच तो घातला गेला पाहिजे.
सामान्य नागरीकांसाठी १०० टक्के कॉटनचे दोन किंवा तीन लेयर मध्ये तयार केलेले असे मास्क उपयुक्त आहे. स्वस्त व दीर्घकाळ उपयोगी असे हे मास्क असतात. दररोज रात्री गरम पाण्यात साबणाने धुवून वाळल्यावर वापरण्याची सवय मात्र पाहिजे.
मास्क घालण्याची शास्त्रोक्त पद्धत असते. मास्कच्या आतील (पुढील) भागास हात न लावता, स्पर्श न करता फक्त मागच्या बाजुला हात लावून मास्क घट्ट बांधला पाहिजे. तोंड, नाक, हनुवटी व मास्क मध्ये पोकळी नसावी व एकदा मास्क घातल्यानंतर त्याला स्पर्श न करणे महत्त्वाचे असते. मास्क काढतांना सुद्धा पुढील भागास स्पर्श न करता तो काढला गेला पाहिजे व नंतर साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे.
मास्क साधारणपणे घराबाहेर पडल्यावर, गर्दीच्या ठीकाणी, प्रवास करतांना निरोगी लोकांनी वापरले पाहिजे. श्वसनविकार ग्रस्त, सर्दी, खोकला, क्षयरोगग्रस्त व्यक्तींनी किंवा त्या व्यक्तींची काळजी घेणाऱ्या केअरटेकरनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. कोरोनासारख्या आजाराच्या संशयीत व्यक्तींसोबत वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी, आरोग्य कर्मचारी यांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. अतिजोखमीचे कार्य करणारे (उदा. कोरोनाग्रस्त किंवा संशयीत मृतदेहाच्या अंतीम प्रकियेत काम करणारे कामगार, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करणारे कामगार यांच्यासाठी असे मास्क वापरणे अनिवार्य आहे.
एकटे असाल, चारचाकी ए.सी. गाडीत प्रवास करत असाल तर मास्क वापरण्याची गरज नाही. जास्त वेळ मास्क वापरल्यास मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे, मळमळ, उलटी व क्वचित वेळा बेशुद्ध होण्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणून दिवसभर मास्क घट्ट स्वरूपात तोंडावर बांधून काम करणे त्रासदायक आहे.
कोरोनासारख्या साथरोगात प्रत्येक व्यक्ती कोरोनाचा वाहक असू शकतो. त्यामुळे वापरलेल्या प्रत्येक मास्क ची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करावयास हवी. ओले झालेले मास्क (रूग्णांच्या शरीरद्रवामुळे) खराब झालेले मास्क, कार्यक्षमता संपलेले मास्क सार्वजनिक ठीकाणी, रस्त्यावर न फेकता ते पिशवीत ठेऊन बंद असलेल्या डस्टबिनमध्ये टाकून जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भातील नियमावलीनुसार नष्ट करावयास हवे
डॉ. नरेंद्र ठाकूर
नगरसेवक, न.पा. एरंडोल
संचालक, सुखकर्ता फाऊंडेशन
संपर्कसूत्र : ९८२३१ ३७९३८








