नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारचा दिवस अमेरिकेसाठी काळा दिवस ठरला. करोनाच्या संसर्गाने एकाच दिवसांत तब्बल ९१२ जणांचा मृत्यू झाला. तर, तब्बल २४ हजार नवे रुग्ण आढळले. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकन सरकारची चिंता वाढली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेतील मृतांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे.जगभरातील सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. चीनमध्ये पहिला करोनाचा रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे प्रशासन, सरकारची चिंता वाढली आहे. मंगळवारी, एकाच दिवसात करोनाची बाधा झालेले तब्बल २४ हजार ७४२ रुग्ण आढळले. तर, ९१२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेत आता एक लाख ८८ हजारहून अधिक करोनाबाधित असून चार हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोनाचे ७५ हजार रुग्ण आढळले असून १७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एकूण मृतांपैकी न्यूयॉर्कमधील संख्या ही जवळपास ४० टक्के आहे.
दरम्यान, ‘करोना’ विषाणूच्या साथीविरोधात लढ्यात अमेरिकेसाठी पुढील ३० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या ३३ कोटी लोकसंख्येपैकी २५ कोटीहून अधिक लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांचे जीवन वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यास प्राधान्य आहे. अर्थव्यवस्था माझ्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकांचे जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मला वाटते अर्थव्यवस्था वेगाने पुन्हा मार्गावर येईल,’ असेही ट्रम्प म्हणाले.