मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अशातच सोलापुरमधून दिलासादायक बातमी येत आहे. सोलापूर जिल्ह्यात एकही करोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 181 व्यक्ती होते. त्यापैकी 117 व्यक्तींचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सध्या होम क्वारंटाईनमध्ये 141 व्यक्ती आहेत. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये 39 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यातील 36 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तीन जणांचे रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत आहेत, असे त्यांनी सांगितले.तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनदेखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.