नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारताने आता चीनवर अवलंबून राहू नये असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले आहे. त्याऐवजी भारतामध्येच निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची आणि स्वत:च संशोधन तसेच शोधांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि चीन सीमेवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी केलेल्या सूचक वक्तव्यावरुन भारत आणि चीनमधील ट्रेड वॉर भविष्यात आणखीन वाढू शकते अशी चिन्हे दिसत आहे. कोविड 19 नंतर भारतीय इलेक्ट्रीक व्हेइकल रोडमॅप म्हणजेच विजेवर चालणार्या गाड्यांचे भविष्य या विषयावरील एका वेबिनारमध्ये गडकरी सहभागी झाले होते. हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते. यापूर्वी मी थेटपणे बोललो नाही मात्र आता भारताने चीनवर अवलंबून राहू नये . सध्या चिनी उत्पादनांच्या किंमती कमी आणि आकर्षक आहेत. याचाच फायदा घेत भारतीय इलेक्ट्रीक कंपन्याही ही उत्पादने आयात करुन चांगला फायदा कमवत आहेत.
मात्र दूरदृष्टीने विचार करता चीनमधून आयात केल्या जाणार्या वस्तूंचे भारतात उत्पादन करणे आवश्यक आहे असे मतही गडकरींनी व्यक्त केले. चीनवर विसंबून राहणे कमी केले नाही तर आपल्याला अधिक चांगल्या भविष्याचा विचार करता येणार नाही. सुरुवातील चिनी कंपन्या कमी आणि आकर्षक किंमतीमध्ये सामान पुरवतील. मात्र नंतर निर्मिती वाढवल्यावर याच कंपन्या जास्त दराने वस्तू विक्री करतील. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच वाहन उद्योगाने प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मनिर्भर बनने गरजेचे आहे. आत्मनिर्भर होणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असेही त्यांनी सांगितले.