नवी मुंबई (वृत्तसंस्था) – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसोबत भगवा ध्वज फडकवला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधताना भाजपला टोला लगावत ठाकरे शैलीत फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण मोडीत काढला. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. हिमालयाच्या मदतीला नेहमीच सह्याद्री धावून आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संध्याकाळी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राम मंदिरचा निकाल लागताच मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आलं
शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणारा नाही डगमगणारा नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदलली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आले. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
– कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण 100 लॅब केले आहेत आणि आपण लॅब आणखी वाढवणार आहोत.
– मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर पडू देणार नाही.
– शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे.
– विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे.
– ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणारा नाही.