पुणे (वृत्तसंस्था) – चांदणी चौकात सापडलेल्या त्या तान्हुलीच्या आई-वडिलांचा शोध लागला असून, घरघुती कारणावरून आईने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, ती सोडून गेल्यानंतर गायब झाली होती. तिचा शोध घेऊन तिला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी व्हाट्सअपद्वारे या तान्हुलीचा फोटो व्हायरल केला होता. त्यानुसार या शोध लागला आहे.
लक्ष्मी तुकाराम क्षीरसागर (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या त्या आईचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तुकाराम क्षीरसागर हे कात्रज भागात राहण्यास आहेत. त्यांना एक 12 वर्षांचा मुलगा आहे. पत्नी लक्ष्मी, मुलगा व तान्हुली असे ते राहत होते. तुकाराम हे फर्निचरचे काम करतात. दरम्यान त्यांचे आणि पत्नीमध्ये घरघुती कारणावरून वाद होत असत. लक्ष्मी हिचे माहेर म्हणजेच आई-वडील कोथरूड भागातील सुतारदरा परिसरात राहण्यास आहेत. त्यामुळे तिला या परिसराची माहिती आहे.
लक्ष्मी ही दोन दिवसांपूर्वी घरातून तान्हुल्या बाळाला घेऊन दवाखान्यात जाऊन येते, असे म्हणून दुपारी बाहेर पडली. त्यानंतर ती थेट कोथरूड परिसरात आली. तर येथून ती चांदणी चौकात गेली. त्यानंतर येथील पाण्याच्या टाकीजवळ ती मुलीला घेऊन बसली आणि त्यानंतर मुलीला तिथेच सोडून पसार झाली. सायंकाळी काहीजण या परिसरात गेल्यानंतर मुलीच्या रडण्याच्या आवाजाने मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यावेळी ही घटना समोर आली होती. यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला होता. यानंतर यामुलीचे फोटो व्हाट्सअपला शेअरकरून त्याबाबत काही माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले होते.
दरम्यान शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यापर्यंत ही माहिती गेली.
यावेळी कोर्ट कंपनीत असलेले सहायक निरीक्षक सुयश जोशी यांनी त्यांच्या शाळा व महाविद्यालयीन मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपला ही माहिती शेअर केली. त्यावेळी त्यांच्या बालपणीच्या मित्र बिपीन आवटे यांनी जोशी यांना संपर्ककरून या मुलीबाबत माहिती असल्याचे सांगितले. तसेच या मुलीचे आई-वडील आवटे यांच्या मित्राच्या इमारतीत राहत आहेत, असे सांगितले. त्यानुसार जोशी यांनी कोथरूड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलीचे काका आणि वडील यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी मुलीला ओळखले. तसेच तिची आई रुग्णालयात जाऊन येतो असे म्हणून गेली असल्याचे सांगितले. वडील व काका यांना रात्री कोथरूड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. रात्री त्या मुलीला वडिलांच्या हाती दिले.
मात्र तिच्या आईचा शोध लागला नव्हता. ती तिच्या आई-वडील माहेरी देखील नव्हती. यामुळे पोलीस चिंतेत होते. लक्ष्मी हिच्याकडे मोबाईल असल्याचे सांगितल्यानंतर त्याचे लोकेशन काढण्यात आले. मग, ती वारजे परिसरत असल्याचे निष्पन्न झाले. तो परीयंत पोलीस वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून तिचा शोध घेत होते. वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी वारजे माळवाडी भागात पथकासह धाव घेतली. तसेच ब्रिजच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली असता लक्ष्मी ही वारजे माळवाडी ब्रिजच्या खाली उभारलेली आढळून आली. तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी ठाणे गाठले. चौकशीत तिने विसरले असे सांगितले.
तान्हुलीला घेऊन घराबाहेर पडलेली लक्ष्मी थेट कोथरुड येथे आली होती. पोलिसांनी या तान्हुलीला सोडून जाण्याचे कारण विचारले असता तिने ‘मी विसरून गेले’ माझ्या लक्षातच आलं नाही’ असे सांगितले. त्यावेळी पोलिसही तिचा खोटारडे पणा ऐकूण आवक झाले. मला भूक लागली होती, पोटात काही नव्हतं, त्यात मी विसरले असे तिचे म्हणणे होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिला अटक केली.