नवी मुंबई (वृत्तसंस्था) – महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची नाराजी आणि त्यानंतर यावर पडलेला पडदा या संबंधी प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. विखे पाटील म्हणाले, एवढी वर्षे काँग्रेस सोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष यापूर्वी आपण कधीच पाहिले नाहीत, अशी टीका त्यांनी थोरात यांच्यावर केली आहे.

शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी त्यांचे पारंपारिक राजकीय स्पर्धक बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उद्देशून त्यांनी ही टीका केली. विशेष म्हणजे कुरबुरी सुरु असताना विखे पाटील यांनी या वादावर भाष्य करणे टाळले होते. विखे पाटील म्हणाले, सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही असे ते म्हणाले.
विखे पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसच्या मंत्र्यांना विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्ता सोडून सरकारमधून बाहेर पडावे. सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या मुखपत्रातून कुरकुरणारी जुनी खाट अशा शब्दांत खिल्ली उडवली तरी काँग्रेस नेतृत्वाला काहीही वाटत नाही. एवढे होऊनही आम्ही समाधानी आहोत असे जर ते म्हणत असतील तर तो एक मोठा विनोद आहे किंवा मग ते सत्तेसाठी लाचार आहेत, असेच म्हणावे लागेल. एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी त्यांच्याकडून अपेक्षाच करता येणार नाही, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.
विखे-पाटलांना थोरातांचे जोरदार प्रत्युत्तर
विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सतत पाया पडणारा विरोधी पक्ष नेता राज्याने पाहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला लाचार म्हणाऱ्यांनाच हा शब्द योग्य ठरतो, असा शब्दात त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.







