मुंबई (वृत्तसंस्था) – परभणी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. तो पंधरा दिवसांपूर्वीच लॉकडाऊनच्या काळात शहरात आला होता. पुण्यातून तो मोटार सायकलने परभणीत आला. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. तरीही चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल त्या कोरोना बाधित युवकाविरूध्द व त्यास आश्रय दिल्याबद्दल त्याच्या नातेवाईका विरूध्द येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात एक सुध्दा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. प्रशासनाने त्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्याच्या सीमेवर 15 ठिकाणी नाकाबंदी पॉईट लावून सुध्दा चोरीच्या मार्गाने या युवकाने पूणे येथून परभणीत जिल्ह्यात मोटारसायकलद्वारे येवून जिल्ह्यात प्रवेश केला. एमआयडीसी परिसरात तो बहिणीकडे वास्तव्यास राहिला. त्यामुळे त्याच्या विरूध्द व त्यास आश्रय दिलेल्या नातेवाईकाविरूध्द भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 व 51 आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.