मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात एकजुटीने सामना करु, पक्षीय राजकारण बाजूला ठेवा असं वारंवार आवाहन करत असतानाही भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की,’राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!`, असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर चांगलीच खोचक टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी, अशी शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने करून आठवडा होत आला तरी त्यावर निर्णय होत नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. राज्यपालांनी हा प्रस्ताव कायदेशीर विचारांसाठी पुढे ठेवल्याचे समजते. राज्याच्या अॅडव्होकेट जनरलनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीत ठाकरे यांची नियुक्ती करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिल्याचे समजते आहे. तरीही विलंब होत असल्याने महाआघाडीचे नेते सध्या चिंतेत आहे. ठाकरे हे 28 मे पूर्वी विधीमंडळाचे सदस्य झाले नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची चिन्हे आहेत.