पुणे (वृत्तसंस्था) – पिंपरी आणि चिंचवड मधून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून यामध्ये दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई अजित अण्णा सानप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश नामदेव पालवे (वय 29, रा. रिहे मोरेवाडी, ता. मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रोडवर फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंडजवळ मोहननगर येथे सापळा रचून मंगेश पालवे याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 50 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.
चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दोनचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव कापसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल अशोक भेगडे (वय 30, रा. घोटवडे, ता. मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला हॉस्पिटल कडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या रोडवर वाल्हेकरवाडी कॉर्नर येथे पोलिसांनी अमोल भेगडे याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.