सातारा (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील पाच जणांचे करोना रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन सातारा तालुक्यातील व दोन कराड तालुक्यातील आहेत. तर एक महिला मूळची सोलापूर जिल्ह्यातील असून ती मुंबईतून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता १३८ झाली आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे २६ वर्षीय व ६७ वर्षीय पुरुष तसेच मूळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक ३२वर्षीय महिला व कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील ५३ व २२ वर्षीय दोघे अशा एकूण पाच जणांचे करोना अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २६, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ६४ व फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ३ अशा एकूण ९३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १३८ झाली असून यापैकी ७० जण उपचार घेत आहेत. ६६ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.







