न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – करोना या जागतिक महामारीवरून मागील काही दिवसांपासून अमेरिकेने चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधान वातावरण निर्माण झाल्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या पुस्तकातून छपाईपूर्वीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोल्टन यांनी आपल्या या पुस्तकातून चीन आणि अमेरिकेच्या संबंधांविषयी गौप्यस्फोट केला आहे. तसेच अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ट्रम्प यांनी चीनकडे मदत मागितल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही नामांकित इंग्रजी वर्तमानपत्रात बोल्टन यांच्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये जपानच्या ओसोका येथे जी -२० शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तसेच चीनची आर्थिक क्षमता कशाप्रकारे अमेरिकेतील निवडणूक प्रचारावर प्रभाव टाकू शकते, यावर त्याच्यात चर्चा झाली. तसेच जिनपिंग यांच्याकडे ट्रम्प यांनी निवडणूक जिंकवण्याचे आवाहनही केल्याचा दावा बोल्टन यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेतील शेतकर्यांचे महत्त्वावर चर्चेदरम्यान जोर दिला आणि चीनने सोयाबीन आणि गहू खरेदी केल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो, यावरही भाष्य केले. ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापार युद्ध संपविण्याची आणि पश्चिम चीनमधील उइगर मुस्लिमांसाठी शिबिर सुरू करण्याची ऑफर दिली होती, असा दावा बोल्टन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
दुसरीकडे बुधवारी अमेरिकेने चीनमधील उइगर मुस्लिमांविरूद्ध चीनविरोधात कारवाई करणारे विधेयक मंजूर केले. त्याअंतर्गत त्यांच्या देखरेख ठेवणाऱ्या आणि त्यांना नजरकैद केंद्रात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. चीनविरोधात उचलण्यात आलेले हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे हवाईमध्ये चीनच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी गेले असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.