पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरात शहरातील तब्बल 7 लाख 73 हजार घरांची तपासणी पूर्ण केली आहे. यामधील सुमारे 25 लाख पुणेकरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित सर्वेक्षणही पुढील काही दिवसांत पूर्ण करण्यासाठी सुमारे 800 पथके कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या सर्वेक्षणात करोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांची माहिती तातडीनं संकलित करून आरोग्य विभागास कळविण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत पुण्यात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सुरूवातीला रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातच आधी तपासणी करण्यात येत होती. मात्र, साथीचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने त्यानंतर 16 मार्चपासून घरोघरी सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात, जादा धोका असलेले वयस्कर तसेच हायरिस्क रुग्ण आणि घरातील आजारी व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची तब्बल 800 पथके सर्वेक्षणासाठी नियुक्त केली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशी करोनाची लक्षणे आहेत का, याची तपासणी केली जात आहे. ज्या नागरिकांना अशी लक्षणे आहेत, त्यांची माहिती आरोग्य विभागाला कळविण्यात येते. त्यानुसार बरोबर एका महिन्यात 7 लाख 73 हजार 284 घरांना भेटी देऊन 25 लाख 76 हजार 501 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यात जवळपास 1 हजार 483 नागरिकांना सर्दी, ताप, खोकला यांची लक्षणे आढळून आली. त्यामधील 1 हजार 122 नागरिकांची माहिती पालिकेच्या दवाखान्यांना कळविण्यात आली आहे. तर जवळपास 360 नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.