न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – सर्व जगाचा जीव मुठीत आणणाऱ्या कोरोना विषाणू विषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनमध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी उमेदवाराकडून कोरोना विषाणूचा संसर्ग बाहेर पसरला, असे वृत्त अमेरिकेतील एक वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तामध्ये स्रोताचे नाव देण्यात आलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला दुजोरा दिला आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या विषाणूचा उगम वटवाघूळापासून झाला आहे. पण हा विषाणू काही जैविक अस्त्र नाही. या विषाणूचा वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये अभ्यास केला जात होता. या विषाणूचा मानवामध्ये कसा संसर्ग होता, याचा अभ्यास सुरू असताना तेथील प्रशिक्षणार्थी उमेदवाराला त्याची चुकून लागण झाली आणि तिथून तो वुहानमध्ये पसरला, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. वुहानमधील मृत प्राणी विक्री बाजारातून या विषाणूचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. पण या बाजारामध्ये वटवाघूळ कधीच विकले जात नव्हते. मग हे संक्रमण तिथे कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. चीनमधील सरकारकडून दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात आली, असे या वृत्तात म्हटले आहे. विषाणूंचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास करण्याचे आणि त्यावर औषधे शोधण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे अमेरिकेपेक्षा प्रगत आहे, असे चीनला दाखवून द्यायचे होते. त्यासाठीच वटवाघूळाकडून या विषाणूचे मानवामध्ये संक्रमण केले गेले आणि तिथून विषाणू चुकीच्या पद्धीने या लॅबमधून बाहेर पडला, असे वृत्तवाहिनीने वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारावर म्हटले आहे.