न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – करोनाविरोधात प्रत्येक देश आपापल्या परीने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. याच देशांचे कौतुक आता संयुक्त राष्ट्राने देखील केले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी इतर देशांना मदत करणाऱ्या देशांना सलाम ठोकत त्यांचे कौतुक केले आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे. एका वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकते असा अंदाज असून अमेरिकेत त्याची पडताळणी केली जात आहे. अमेरिकेतील १५०० रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे. अमेरिकेनंतर इतर देशांनीही भारताकडे आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर या मागणीत मोठी वाढ झाली आहे.’करोनाशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे अशी भावना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे,’ असे अँटोनियो ग्युटेरेस यांनी म्हटले असल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. भारत इतर देशांना औषधांचा पुरवठा तसेच इतर मदत पुरवत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.