मुंबई (वृत्तसंस्था) – मध्यप्रदेशात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बेफिकिरी, हलगर्जीपणा, अहंकार आणि नव्या पिढीस कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याची टीका शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.
दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षातच बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात फूट पडली. काँग्रेसच्या किमान 22 आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा त्याग केला. शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार कोसळलेच तर त्याचे श्रेय भाजपच्या चाणक्य मंडळाने घेऊ नये. कमलनाथांचे सरकार कोसळताना दिसत आहे ते बेफिकिरी, हलगर्जीपणा, अहंकार आणि नव्या पिढीस कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे, असा टोला शिवसेनेने काँग्रेसला लगावला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे फार काही मागत नव्हते. सुरुवातीला ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मागत होते. नंतर त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितली अशा उडत्या चर्चा आहेत. यापैकी एखादी मागणी मान्य केली असती तर तेलही गेले आणि तूपदेखील गेले अशी वेळ काँग्रेसवर आली नसती. तसेच ज्योतिरादित्य यांच्यासारखा नेतापक्ष सोडून भाजपमध्ये गेला नसता, असेही सामनातून म्हंटले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशात टाळून राजकारण करता येणार नाही. शिंदे यांचा प्रभाव संपूर्ण राज्यावर नसेलही, पण ग्वाल्हेर, गुना अशा मोठय़ा भागावर आजही शिंदेशाहीचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे हाच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता. पण नंतर ज्येष्ठांनी त्यांचा काटा काढला व दिल्लीचे हायकमांड हतबलतेने पाहात राहिले, असल्याचा टोलाही शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसला लगावला आहे.