सातारा (वृत्तसंस्था) – गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागात वळीव पाऊस हजेरी लावत आहेत. शनिवारी पहाटे वाईसह जावली तालक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत, घरांचे पत्रे उडाले आहेत तर शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शेतांची अवस्था अक्षरश: तळ्यांप्रमाणे झाली आहे.
गुरुवारी रात्री सातारा शहरासह परिसरात अवकाळी पावसाने चांगला तडाखा दिला होता. वाई, जावली तालुक्यातही ढगाळ वातावरण होते, जोरादार वादळही होते, परंतु पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र शुक्रवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा आणि ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. परंतु रात्री उशिरापर्यत पाऊस पडला नाही, मात्र पहाटेच्या वेळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाई तालुक्यातील, पाचवड, उडतारे, भुईंज, चिंधवली तसेच जावली तालुक्यातील आनेवाडी, सायगाव, रायगाव, यासह दोन्ही तालुक्याच्या इतरही बहुतांशी गावांना या पावसाने चांगलाच तडाखा दिला.
वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये तसेच रस्त्यांवरही झाडे उन्मळून पडली होती. तर काही ठिकाणी गुरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले होते. घरांचे पत्रे उडून गेले होते. सुमारे दीड-दोन तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेत जमिनींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतांना जणूकाही तळ्यांचे स्वरुप आले आहे.