मुंबई (वृत्तसंस्था) – अधिक प्रभावी नियोजन व संनियंत्रणासाठी कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे. ‘कंटेन्मेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारत’ अशी आणखी एक नवी वर्गवारी निर्धारित आहे. या सुधारित पुनर्रचनेनुसार महापालिका क्षेत्रात आता 661 ‘कंटेन्मेंट झोन’ असून 1 हजार 110 ‘सीलबंद इमारती’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ज्यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचेही अधिक प्रभावी नियोजन व व्यवस्थापन शक्य होणार आहे.
ज्या भागात बाधित रुग्ण आढळून आला आहे; ते भाग यापूर्वी सरसकटपणे ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित करुन त्या भागावर अधिक काटेकोर देखरेख ठेवली जात असे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह पालिका कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात येत असे. मात्र एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित केल्यामुळे पोलिसांच्या व महापालिकेच्या स्तरावर मनुष्यबळाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यास अडचणी येत होत्या.
ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कंटेन्मेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारती’ ही आणखी एक वर्गवारी आता निर्धारित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘कंटेनमेंट झोन’ची अधिक सुयोग्य व अधिक संयुक्तिक पुनर्रचना देखील करण्यात आली आहे. सीलबंद इमारती आणि कंटेनमेंट झोन भागांच्या प्रभावी संनियंत्रणासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.