मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत वानखेडे सारखे मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबोन स्टेडियम ही वापरण्यात यावे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. पण पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही असे आदित्य ठाकरे यांनीच ट्विट केल्याने वानखेडे आणि ब्रेबोन स्टेडियम येथील मैदान वापरले जाणारे नाही हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवल वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियम इथे व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर यांनी केली. परंतु वानखेडे भागातील स्थानिक नागरिकांनी क्वारंन्टाईन सेंटरला विरोध केला. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी वानखेडे प्रमाणे ब्रेबोन स्टेडियम ही वापरावे असे ट्विट केले.
खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटला स्वत: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, पावासाळ्यात खेळाचे मैदान वापरणे शक्य नाही. कारण पावसाच्या पाण्यामुळे तिथे चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाईनसाठी टणक (concrete) पृष्ठभूमी पाहिजे त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत. त्यामुळे वानखेडे ,ब्रेबोन येथील मैदान वापरणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. फक्त गरज पडल्यास या स्टेडियममधील पार्किंगआणि खोल्या वापरता येईल का याचा निरामय वेळेनुसार महापालिका घेईल.